कोविड-19 संसर्ग कमी झाल्यानंतर आता विदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून परतणाऱ्यां प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. भारतात 15 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होऊ शकतात. कोविड नियमांतर्गत देशाच्या विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या आणि परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रभावी मानक कार्यप्रणाली पाळल्या जातील. सध्या भारतातील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवर 28 फेब्रुवारीपर्यंत बंदी लागू आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 जानेवारी 2022 पर्यंत निलंबित करण्यात आली होती.
भारतात ‘एअर बबल’ व्यवस्थेअंतर्गत जुलै 2020 पासून सुमारे 40 देशांदरम्यान विशेष प्रवासी उड्डाणे चालवली जात आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितले की कोविडच्या प्रकरणांमध्ये सातत्याने होत असलेली घट पाहता आरोग्य मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पूर्वीप्रमाणेच नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या संदर्भात अधिकृत सूत्राने सांगितल्यानुसार 15 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 14 फेब्रुवारीपासून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना काही शिथिलता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने 14 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत सात दिवस अनिवार्य होम क्वारंटाईन आणि आठव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणीची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. याशिवाय ‘जोखीम देश’ आणि इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत.