ताजी बातमी ऑनलाइन टीम
आष्टा ( जि. सांगली ) येथील तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारासह दाेघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील ( वय ५२ ), महसूल सहाय्यक सुधीर दीपक तमायचे ( ३७ ) यांच्यावर आष्टा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातबारा उताऱ्यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून मिळणेबाबत तक्रारदारांनी आष्टा अपर तहसील कार्यालयात अर्ज केला हाेता. यासाठी नायब तहसीलदार बाजीराव पाटील , महसूल सहाय्यक सुधीर तमायचे यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.
याबाबतचा तक्रार साेमवारी ( दि. २१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली. विभागाने पंचा समक्ष पडताळणी केली. यामध्ये पाटील व तमायचे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले.
आज ( दि. २२) अपर तहसीलदार कार्यालय आष्टा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. कार्यालयात बाजीराव पाटील व तमायचे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दाेघांवर आष्टा पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.