श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचा समना करावा लागत आहे. आता युवा फलंदाज सूर्यकुमार यादव देखील दुखापतग्रस्त झाला आहे. सुर्यकुमारच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होते. तो प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. मात्र गुरुवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी तो दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे.
यापूर्वी वेगवान गोलंदाज दीपक चहर देखील संघाबाहेर पडला आहे. दीपक चहरला विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात पायाच्या स्नायूंच्या ताणामुळे श्रीलंका मालिकेतून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर आता सूर्यकुमारच्या हातातील फ्रॅक्चर समोर येताच त्यालाही वैद्यकीय पथकाने पांढऱ्या चेंडूच्या या मालिकेसाठी अनफिट घोषित केले आहे. विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी केएल राहुल देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर आहे.
याशिवाय भारतीय निवड समितीने माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांना टी-20 मालिकेतून विश्रांती दिली आहे. भारतीय संघाकडे खेळाडूंचा मोठा समूह आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचे आव्हान पेलताना संघाला कोणतीही अडचण येणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.