ताजी बातमी ऑनलाइन टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता बारवीच्या वेळापत्रकात (HSC Exam Timetable) बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
बारावीच्या
विद्यार्थ्यांच्या भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. नुकताच अहमदनगरमधील संगमनेर येथे बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाकडून (Education Board) हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र आता 5 मार्च आणि 7 मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. 12वीचा 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर (Hindi Exam Paper)आता 5 एप्रिलला होणार आहे. तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर (Marathi Exam Paper) हा 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Board of Education Chairman Sharad Gosavi) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘यावर्षी शिक्षण मंडळाची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. 4 मार्चला इंग्रजीचा पेपर (English Exam Paper) होईल. परंतू 5 मार्च आणि 7 मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होणार होती. बुधवारी दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये 5 आणि 7 मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील 5 आणि 7 मार्चच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार 5 मार्चची परीक्षा 5 एप्रिलला होईल आणि 7 मार्चची परीक्षा 7 एप्रिलला होणार आहे.’
शरद गोसावी यांनी पुढे सांगितले की, ‘जळून खाक झालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदी आणि इतर 25 प्रकारच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. रशियन, फ्रेंच, जापनीज, उर्दू, तेलगू, मल्याळम या विषयांचाही यात समावेश आहे. त्या प्रश्नपत्रिका ओपन झाल्या आहेत. त्यामुळे हा ट्रक फक्त पुणे विभागाचा असला तरी अन्य 8 विभागांनाही या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता. त्यामुळे राज्यभरातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागत आहेत.’