माढा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी 3 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फलटणमधील उद्योजक आणि त्यांचे निकटवर्तीय असलेले दिगंबर आगवणे यांनी केला आहे. याबाबत दिगंबर आगवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याकडे अर्ज करून रितसर तक्रार नोंदवलेली आहे. केलेल्या तक्रारी अर्जात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यामध्ये गेल्या दहा वर्षात अनेक आर्थिक व्यवहार झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांमध्ये 3 कोटी 40 लाख रुपये खा.निंबाळकर यांच्याकडून येणे अपेक्षित असताना ते मिळालेले नाहीत त्यामुळे जर मला न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर खासदारांनी देखील निकटवर्तीय माझ्या कारखान्याचे 7 कोटी रूपये देणे असल्याचे जाहीर केल्यापासून नेमकी कुणाची फसवणूक झाली आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
दिगंबर आगवणे यांनी केलेल्या आरोपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खंडन करीत आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल आहेत, अशी टीका करत उलट आगवणे हेच माझ्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणे लागत असून तसे पुरावे पोलिसांच्या कडे दिले असल्याचे खा.निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमकी कुणाची फसवणूक झाली असेल अशी अनेकांना शंका आहे. त्याचबरोबर एकमेकांवरती आरोप केल्याने पोलिसांनी तपास केल्यानंतपर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल असं वाटतं.