अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या विशेष तपास पथकाला आढळून आलं आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाने केलेल्या आरोपांच्या विरोधात एसआयटीचे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता. NCB मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असे निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढले आहेत.
एसआयटीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. हा अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी कायदेशीर मतं घेतली जातील. विशेषत: आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळले नसतानाही ड्रग्ज सेवनासाठी शिक्षा होऊ शकते का, या पैलूवर कायदेशीर मतं घेतली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र एसआयटीच्या तपासाने छापेमारी आणि एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत. एसआयटीने अनेकदा वानखेडे यांचीसुद्धा चौकशी केली आहे. आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितलं नव्हतं, असंही एसआयटीच्या चौकशीतून स्पष्ट झालं.
गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले होते. एनसीबीने 14 जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात एनसीबीने आणखी 17 जणांना अटक केली. व्हॉट्सअॅप चॅट्सचा आधार घेत वानखेडे यांच्या टीमने दावा केला की हे आरोपी ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा भाग आहेत. आर्यन खान काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात होता आणि त्याच्या चॅटमध्ये ‘हार्ड ड्रग्ज’ आणि ‘मोठ्या प्रमाणात’ असा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती.