पंचगंगा प्रदूषणप्रश्नी प्रादेशिक कार्यालयाने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करा, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला बुधवारी दिले. पंचगंगा प्रदूषणाची गंभीर दखल घेत ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
पंचगंगा प्रदूषण गंभीर होत चालले आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच पंचगंगेतील मासे मृत होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दि.25 फेब—ुवारीपासून गांधीनगर ते वळिवडे या दरम्यान सुर्वे बंधार्यानजीक पंचगंगेच्या पाण्यात मृत माशांचा अक्षरश: खच पडला होता. सुमारे अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक पात्रावर केवळ मृत मासे तरंगत होते. यामुळे नदीचे पात्रही दिसत नव्हते.