रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. युद्धामुळे केवळ मनुष्य आणि वित्तहानीच झाली नाही तर आंतराष्ट्रीय बाजारपेठेवर देखील या युद्धाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर चांगलेच कडाडले आहेत. भारतामध्ये देखील मौल्यवान धातुच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. भारतता आज दहा ग्रॅम अर्थात एक तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत ( 47700 रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचा दर 46690 इतका होता याचाच अर्थ आज सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल एक हजारांची वाढ झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती सतत बदलत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली असून, चांदी प्रति किलो 67 हजार 200 रुपयांवर पोहोचली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47700 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52040 एवढे आहेत. पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47780 एवढी आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 50140 रुपये इतकी आहे. तर नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47800 इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 50,140 इतकी आहे. चांदीच्या दरामध्ये देखील 672 रुपयांची वाढ झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 67 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत.