कराड तालुक्यातील चचेगाव येथे एका 25 वर्षीय युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाला. कोयना नदीपात्रात ग्रामपंचायतीच्या चोवीस बाय सात पाणी योजनेचे काम करत असताना पाय घसरून पडला होता. काल बुधवारी दि. 2 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय हणमंत पाटील (वय- 25, रा. कुसूर, ता. कराड) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चचेगाव गावच्या पाणी योजनेच्या कोयना नदीपात्रातील पाईपजवळ फुटबॉल सोडण्यास गेला होता. काल बुधवारी सायंकाळी काम करत असताना पाय घसरून अक्षय हा नदीपात्रात बुडाला होता. काही वेळात चचेगाव गावात ही बातमी पसरली होती. गावकऱ्यांनी अक्षय यांचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अंधार पडल्याने शोधमोहिम काल रात्री थांबविण्यात आली होती.
आज गुरूवारी दि. 3 रोजी सकाळपासून कराड शहर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने पुन्हा शोधमोहिम राबविण्यात आली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अक्षय यांचा मृतदेह आढळून आला. अक्षय यांचे शवविच्छेदन कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे.