ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपलं अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात घडली आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अर्वाच्य घोषणा दिल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, माझ्या मते दोन्ही बाजूने घोषणा प्रति घोषणा झाल्या व या गदारोळामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण संपवावं लागले. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण सुरु केल्यानं सभागृहात गदारोळ सुरु होता. यानंतर राज्यापालांनी लगेचच भाषण थांबवलं आणि ते विधानभवन परिसरातून बाहेर पडले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. आता, एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही या मुद्यावरुन फटकारलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला होता. त्या वादाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले आहेत. सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधकांकडून देखील घोषणाबाजी सुरु होती. याच दरम्यान राज्यपालांनी अभिभाषण थांबवलं. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकारण्यांच्या कान टोचले आहेत. राज्यापालांच्या अभिभाषणानंतर राजकारण करता आलं असतं. त्यांना अभिभाषण पूर्ण करुन द्यायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.