नागराज मंजुळेंचा झूंड थिएटरमध्ये काल प्रदर्शित झालाय आणि अजूनही त्या सिनेमाचं प्रमोशन सुरु आहे. खुद्द नागराज आणि टीमनं पुण्यात हलगी वाजवत झूंडचं प्रमोशन केलं. गेल्या काही काळात बॉलीवुडचे टॉपचे डायरेक्टर्स तसच अभिनेत्यांसाठी स्पेशल शोजचं आयोजनही केलं गेलं. त्यांच्या प्रतिक्रिया घेत, लोकांना दाखवत झूंडचं प्रमोशन केलं गेलं पण ह्या सगळ्या प्रमोशनमधून एक गोष्ट गायब आहे किंवा दिसत नाहीय ती म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांची हजेरी. झूंडचे नायक आहेत अमिताभ बच्चन पण त्याच्या प्रमोशनसाठी एक दिवसही त्यांनी दिला नसल्याची चर्चा जोरदारपणे रंगतेय. एक दिवस काय, प्रमोशनच्या एकाही इव्हंटला ते दिसलेले नाहीत.
Kolhapur : हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कलश
ज्या सिनेमाचा हिरोच अमिताभ बच्चन असतील त्याला प्रमोशनची गरज काय? असा एक युक्तीवाद केला जातोय. हे खरं असलं तरी सुद्धा कोरोनानंतरची जी स्थिती आहे आणि त्यातून निर्माण झालेली भीती आहे ती अजून तरी प्रेक्षकांच्या मनातून पूर्णपणे गेलीय असं दिसत नाही. आमच्या प्रतिनिधीनं पहिल्या दिवशी (4 मार्च) मुंबईतल्या थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा पाहिला. प्रेक्षकांची संख्या तुरळकच होती. विशेष म्हणजे सिनेमा अफाट आहे. नागराज मंजुळेंनी जे दाखवलंय ते बॉलीवुडमध्ये सहसा दिसत नाही किंवा दिसलेलं नाही, इतका झूंड पायवाट मोडणारा आहे. जेवढे प्रेक्षक थिएटरमध्ये होते त्यांच्याकडून काही प्रसंगांना तर टाळ्या पडत होत्या. सिनेमा एवढा भारी असेल तर मग प्रेक्षक एवढे तुरळक का असा प्रश्न नक्की पडतो. त्याला वेगवेगळी कारणं सांगितली जाऊ शकतात. पण एक कारण सिनेमाचं न झालेलं प्रमोशन हे नक्की देता येईल. खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट सोडले तर कुठं प्रमोशन केल्याचं दिसलं नाही. का?
बिग बींनी झूंडचं प्रमोशन केलंय पण ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन. झूंडच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजे 3 मार्चला अमिताभ बच्चन यांनी Jhund नहीं sir team बोलिए, team !! असं एक प्रमोशनल ट्विट केलंय. त्यानंतर पुन्हा दुसरं एक ट्विट आहे ज्यात ते म्हणतात, की आमचा झूंड आता क्लाऊड नाईनवर आहे. तिकीट बुक करा. सिनेमा बघा. याशिवाय मात्र कुठलही प्रमोशन त्यांनी केलेलं नाही. खरं तर झूंडचे सगळे परिक्षण मग ते विविध पत्रकारांनी केलेले असोत की न्यूज चॅनल्सनी, ते कमीत कमी साडे तीन स्टार्स देणार आहेत. म्हणजे झूंड प्रदर्शन होण्याआधीच तो पसंतीस उतरलेला आहे. झूंड पाहिल्यानंतरही अनेकांनी ट्विटरवर, फेसबूकवर झूंडबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या जरी बिग बींनी लाईक किंवा रिट्विट केल्या असत्या तरी सुद्धा थिएटरमध्ये प्रेक्षकांना आणण्यास पुरेशा ठरल्या असत्या. अजूनही ती वेळ गेलेली नाही. बिग बी ते करणार का?
झूंडच्या निर्मात्यांपैकी एक आहेत टी सीरिज. भूषणकुमार. झूंडच्या प्रमोशनसाठी काही स्पेशल शोजचं आयोजन केलं गेलं. त्यात आमिर खान, धनूष, अनुराग कश्यप यांनी झूंडचं तोंडभरुन कौतूक केलंय. ही मंडळी अशी नाहीत की पीआरसाठी सुद्धा एखाद्या सिनेमाला चांगलं म्हणतील. आमिर म्हणाला आम्ही जे काही गेल्या पंचवीस तीस वर्षात केलं त्याचा नागराजनं फुटबॉल केला. साऊथ सुपरस्टार ज्यानं असूरनसारखा सिनेमा केला तो म्हणाला झूंड मास्टरपीस आहे. अनुराग कश्यप म्हणाला, झूंडनं लोक थिएटरमध्ये पागल होतील. आम्ही हा सिनेमा पाहिला आणि ह्या सगळ्या मंडळीच्या प्रतिक्रिया पीआर पलिकडच्या असल्याचं खात्रीपूर्ण सांगतो. आमिर खानने तर झूंडमधल्या अमिताभ बच्चन यांचं काम ‘वन ऑफ द बेस्ट’ असल्याचं म्हटलंय. पण मग खुद्द अमिताभ बच्चन झूंडच्या प्रमोशनमधून गेले कुठं?