वैद्यकीय अभ्यासक्रमात (MBBS) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नवीन 520 जागा वाढवल्या आहेत. सीईटी सेलमार्फत (CET) याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वाढीव जागांवर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. एकूण 9 महाविद्यालयात या जागा वाढविण्यात आल्या आहेत.
राज्यातील काही महाविद्यालयांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान संलग्नतेच्या कारणावरून या महाविद्यालयातील जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दरम्यान, 9 महाविद्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावांपैकी 7 महाविद्यालयांच्या जागा वाढविण्यात आल्या आहे. यासह नवीन महाविद्यालयाला देखील मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या महाविद्यालयांच्या जागा दुसऱ्या फेरीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तर धुळ्यातील एसीपीएम महाविद्यालयाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कर्जतच्या तासगावकर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्याचा शासन अद्यादेश प्राप्त न झाल्याने या दोन्ही महाविद्यालयातील जागा दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या नाही.
या महाविद्यालयात वाढल्या जागा
– शासकीय वैद्यकीय माहाविद्यालय, सिंधुदुर्ग – 100 जागा
– राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे – 20 जागा
– डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती- 50 जागा
– के.जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालय, सायन- 50 जागा
– डॉ. विठ्ठलराव विखे – पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर- 50 जागा
– एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज सायन्स, नागपूर- 50 जागा
– बी.के. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी- 50 जागा
– तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबई- 100 जागा
– जेआययू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जालना- 50 जागा
6 मार्चपासून प्रक्रिया
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या (MBBS) दुसऱ्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि जागा वाटपाची यादी 6 ते 8 मार्च दरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना 13 मार्चपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. कारण 30 मार्चपर्यंत एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.