रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो MBBS च्या विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडून परतावे लागले आहे. आता उर्वरीत शिक्षणाचे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग अॅक्टमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार, ऑपरेशन गंगा अंतर्गत विदेशातून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येणार आहे.
आतापर्यंतच्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग अॅक्ट नुसार, विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्सचा पूर्ण कालावधी तसेच ट्रेनिंग आणि इंटर्नशिप भारताबाहेरच करावी लागत होती. मात्र युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता केंद्र सरकारने यात काही बदल केले आहेत. आता परतलेले हे मेडिकलचे विद्यार्थी भारतात इंटर्नशिप पूर्ण करू शकतात. यापूर्वी विदेशातील अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये समायोजित करण्याची परवानगी नव्हती.
नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे हजारो विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. तसेच कोव्हिड- 19 महामारीमुळे चीनमधूनही अनेक मेडिकलचे विद्यार्थी भारतात परतले आहेत. नाईलाजानं त्यांना तेथील इंटर्नशिप सोडून यावे लागले. ही दोन्ही कारणं, विद्यार्थ्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांची समस्या लक्षात घेता, हे विद्यार्थी भारतातून इंटर्नशिप पूर्ण करू शकतील, असा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.