एसटी नफ्यात येत नाही तोवर नोकर भरतीला फूलस्टॉप असणार आहे. एसटीची नोकर भरती बंद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय जाहीर केला आहे. प्रतिक्षा यादीतल्या उमेदवारांनाही संधी मिळणार नाही. महामंडळ आधीच तोट्यात आहे. त्यातच संपकाळात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खर्च नियोजनात नव्या भरतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी विलीनीकरणासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या तीन सदस्य समिती अहवालातही महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे प्रतीक्षा यादीवरील 2200 कर्मचाऱ्यांचेही दरवाजे बंद झाले आहेत.
एसटीच्या काही कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटी विलीनीकरणावरून गेल्या कित्येक दिवसापासून एसटी कर्मचारी संपावर आहे. अजूनही एसटी कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. यामुळे सामान्य प्रवाशांचा हाल होत आहे. एसटी पूर्ववत करण्यासाठी एसटी महामंडळ सेवानिवृत्त चालक करारपध्दतीने भरती करणार आहे.
दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाही. एसटी महामंडळात जवळपास 87 हजार कर्मचारी आहे. त्यापैकी जवळपास 61 हजार कर्मचारी संपावर आहे. आता महामंडळाने 400 खासगी चालकांची भरती केली तर संपावर असलेले एसटी कर्मचारी काय भूमिका घेतील, यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरन होणार नसल्याने एसटी कर्मचारी आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिवहनमंत्री अनिल परब यांनीही निर्वाणीचा इशारा दिला आहे. दिलेल्या नवीन मुदतीत संपावरील कर्मचारी सेवेवर हजर झाले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.