पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता मेट्रो पुणेकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. यावेळी पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला उपस्थिती लावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी राज्यपालांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींसमोबरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून सुनावलं. आपण ज्यांना आदर्श मानता ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं त्या छत्रपतींची आणि राष्ट्रमाता जिजाऊंची ही भूमी आहे असं यावेळी पवार म्हणाले.
तसेच राज्यात अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत आणि ती महाराष्ट्राला मान्य नाहीत अशी तक्रार उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. तसेच आपल्याला महामानावांचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्यात राजकारण न आणता पुढे जावं लागेल असं देखील पवार यावेळी म्हणाले.