ताजी बातमी ऑनलाईन टीम
तुमच्याकडे कोणतेही वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर भार वाढणार आहे. सरकारने वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवण्याच्या तयारीत आहे. ही वाढ पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून लागू केली जाऊ शकते. हे लक्षात घ्या की सर्व प्रकारच्या वाहन मालकांसाठी विमा अनिवार्य आहे. वाहन मालक फुल पार्टी इन्शुरन्स काढू शकत नसेल तर त्याच्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Motor Insurance) अनिवार्य आहे. अशा स्थितीत विम्याचा हप्ता वाढल्याने वाहनधारकांच्या खिशालाही फटका बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारने जे संशोधन प्रस्तावित केले आहे त्यानुसार एक हजार सीसी (1000 CC) कारवरील थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 2072 रुपये होता. तो आता वाढल्यानंतर 2094 रुपये होईल. तसेच एक हजार ते पंधराशे (1500 CC) सीसी पर्यंतच्या वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी 3416 रुपये प्रस्तावित आहे. यापूर्वी यासाठी 3221 रुपये मोजावे लागत होते. त्याचप्रमाणे 1500 सीसीपेक्षा जास्त वाहनधारकांना प्रिमियम वाढल्यानतंर 7897 रुपये प्रीमियम भरावा लागेल जो पूर्वी 7890 रुपये होता.
दुचाकी चालकांनाही महागाईचा फटका
चारचाकींपाठोपाठ दुचाकी (Two Wheeler) चालकांच्या खिशावर देखील महागाईचा परिणाम होणार आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार दुचाकींच्या बाबतीत 150 सीसी ते 350 सीसीच्या वाहनांसाठी 1,366 रुपये प्रीमियम (Two Wheeler Insurance Premium) भरावा लागेल, तर 350 सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी प्रीमियम 2,804 रुपये असेल. हे लक्षात घ्या की सुधारित थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होऊ शकतो. कोविड-19 महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर ही वाढ लागू होऊ शकते.