केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू येथील ‘आधीश’ बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल केल्याचे मुंबई महापालिकेच्या पथकाच्या पाहणीत आढळले आहे. या प्रकरणी आता दोन आठवड्यानंतर मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 2009 मध्ये बांधलेल्या जुहू येथील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत कारखाने विभागाच्या संयुक्त पथकाने दोन आठवड्यापूर्वी बंगल्याची पाहणी केली होती.
या पथकात के- पश्चिमचे साहायय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्यासह अभियंते अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा समावेश होता. या पाहाणीत संबंधित बंगल्यात 9 ठिकाणी बेकायदा बदल केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नारायण राणे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. हे बांधकाम महापालिकेने दिलेल्या मुदतीत न हटवल्यास महापालिकेच्या वतीने बंगल्यावर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे दिशा सालियन संदर्भात राणे यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांची पोलिसांनी तब्बल 9 तास कसून चौकशी केली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना 9 चा फेरा पडला की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.