ताजी बातमी ऑनलाईन टीम
झी टीव्हीचा (Zee Tv) सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सा रे ग म प’च्या या सीझनच्या विनरची (Sa Re Ga Ma Pa Winner) घोषणा करण्यात आली आहे. सर्वाधिक मतांसह पश्चिम बंगालच्या ‘नीलांजना रे’ने (Neelanjana Ray) या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. ‘सारेगमप’च्या प्रतिष्ठित ट्रॉफीसोबतच
(Sa Re Ga Ma Pa Trophy) नीलंजनाला रोख बक्षीस म्हणून 10 लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे. संगीताच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देत, निलांजनाला खडतर स्पर्धा देणारे राजश्री बाग (Rajashree Bagh) आणि शरद शर्मा (Sharad Sharma) यांना शोचे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजश्री बागला निर्मात्यांकडून 5 लाख रुपये, तर शरद शर्माला 3 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
सारेगमपाची ट्रॉफी जिंकल्यानंतर निलांजनाने सांगितले की, ‘सारेगमपा 2021 जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या या प्रवासात मला मिळालेल्या कौतुक आणि प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांची खूप आभारी आहे. हा माझ्यासाठी असा क्षण आहे जो मी कधीही विसरणार नाही आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की हा अद्भुत प्रवास संपला आहे. सारेगमपाचा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा आहे.’
निलांजनाने पुढे सांगितले की, ‘या प्रवासात मला आमच्या जज, मार्गदर्शकांकडून खूप काही शिकायला मिळाले आणि आमच्या शोच्या सर्व ज्युरी सदस्यांनी दिलेला अभिप्राय खूप प्रेरणादायी आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी या व्यासपीठावर घालवलेले सर्व मौल्यवान क्षण मी जपून ठेवीन. माझ्या सहकारी स्पर्धकांशी जोडले गेल्याने मला खूप आनंद होतो. आमच्या सेटवरील प्रत्येकजण माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखा आहे आणि मला स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी दिल्याबद्दल मी झी टीव्हीचे आभार मानू इच्छिते.’