2019 ची विधानसभा निवडणूक शरद पवारांनी गाजवली. अनेक नेते राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरत होते. शरद पवारांचे अनेक निकटवर्तीयही त्यांची साथ सोडून जात होते. त्यावेळी एकट्या शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढत राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा दिली. त्यावेळी अनेक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी पवारांचा उल्लेख ’78 वर्षाचा तरुण’ असा केला. त्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीही ‘मी अजूनही म्हातारा झालो नाही’ असं थेट कुस्तीच्या मैदानातून सांगितलंय! शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला पवार उपस्थित होते.
व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. त्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या शरद पवारांनी अगदी मिश्किलपणे मी अजून म्हातारा झालो नाही. आयोजक बोलले की या वयात… मी आयोजकांवर नाराज आहे, असं म्हटलं. पवार पुढे म्हणाले की, ‘कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत आहेत याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा श्रेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची’, अशा शब्दात पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशाराही दिलाय.
शरद पवार रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळीही पवारांनी आपण म्हातारे झालो नसल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेलं पक्षांतर, उस्मानाबादचा पाणी प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर शरद पवारांना टोले मारले. तर, उद्धव ठाकरे चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले. सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.