रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभरातील सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर जाणवत आहे. इंधनांच्या दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्चे तेल आणि मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर देशभरात सीएनजीच्या दरात वाढ झाली. त्याचबरोबर देशातील उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 15 रुपयांना वाढ होण्याची शक्यता आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून 6 वाजेपासून नवे दर लागू झाले आहेत. दिल्लीत आता सीएनजीचा दर 57 रुपये 51 पैसे झाला आहे. तर मुंबईत देखील सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजीसाठी 66 रुपये मोजावे लागत आहेत. नवी मुंबईत 63 रुपये 50 पैसे मोजावे लागत आहेत.
देशात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल अर्थात क्रूड ऑईलच्या दर 140 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ करण्याची तयारी केली आहे. इंधन किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 15 रुपयांनी वाढ करण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.