संपावर असलेल्या संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या. ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारे एसटी महामंडळाचे एक गोपनीय पत्रं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या पत्राची होळी केली. तसेच एसटी महामंडळाच्या विलीनिकरणाच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचीही होळी करण्यात आली आहे. या गोपनीय पत्रामुळे सरकारचा चेहरा उघड झाला आहे. हे सरकार दुटप्पी आहे. त्यांना कामगारांचा छळ करून एसटीत पैसे घेऊन त्यांच्या लोकांना भरती करायचे आहे. अधिवेशनात आम्ही त्यावर आवाज उठवणार आहोत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. गोपीचंद पडळकर यांनी या पत्रं आणि अहवालाची होळी केल्यानंतर मीडियाशी संवाद साधला.
कामगारांना कामावर हजर राहू द्या, हजर झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असं अधिकाऱ्यांना आदेश देणारे गोपनीयतेचं पत्रं आम्हाला उशिरा मिळालं. या पत्राची आम्ही चिरफाड करणार आहोत. माधव काळेंच्या सहीने पत्रं दिलं आहे. एकदा एसटी सुरळीत झाली की कारवाई करा, असं त्यात म्हटलं आहे. सरकार दुटप्पी आहे. त्यांचा दुतोंडीपणा उघड करणार आहोत, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. हे गोपनीयतेचं पत्रं आणि त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कामगार विरोधी आहे. त्याची आम्ही होळी केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.