ताजी बातमी ऑनलाईन टीम
अंबाबाई आणि जोतिबा या देवतांना आता नव्या तोफा सलामी देणार आहेत. या तोफा देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आल्या असून स्वच्छता आणि चाचणीनंतर त्या सलामीसाठी सज्ज होतील.
रमणमळा गोदामाजवळील हनुमान मंदिराजवळ अनेक वर्षांपासून पडून असलेल्या तोफा महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुधवारी या तोफा अंबाबाई मंदिरात आणण्यात आल्या. या तोफांवर असलेला रंग काढून व त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्या वापरात येणार आहेत. यातील लहान तोफ ही अंबाबाई मंदिरात तर मोठी तोफ दख्खनचा राजा जोतिबाच्या सेवेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिरात धार्मिक विधींच्यावेळी तोफ उडविण्याची परंपरा आहे. सध्या मंदिरातील तोफा खराब झाल्याने त्या बदलण्यात येत आहेत. त्याच्या शोधासाठी इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर-देसाई यांची मदत घेण्यात आली. त्यांनी रमणमळा परिसरातील या तोफांची माहिती देवस्थान समितीला दिली होती. त्यानंतर समितीने महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागकडे पाठपुरावा केला.