रत्नागिरी शहरातील चर्मालयजवळील किस्मत बेकरीसमोर गुरुवारी सकाळी 11.20 वा. अवजड 14 चाकी ट्रक ब्रेक फेल झाल्याने उतारात मागे आला. यात झालेल्या अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणी जखमीही झाले नाही.
गुरुवारी दुपारी गंगाराम शोभाराम(रा. मध्यप्रदेश) आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-18-बीए-5484) घेऊन किस्मत बेकरीसमोर ट्रकमधील तांदळाची पोती उतरवत होता. त्यावेळी त्याने ट्रकचा हॅन्डब्रेक लावला होता. परंतु उतारात ब्रेक फेल झाला.
त्यावेळी ट्रकच्या पाठीमागे दुचाकीचालक गणेश शिवाजी चव्हाण (रा. राजापूर) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-04-जीवाय-6985) पेट्रोल संपल्यामुळे हाताने ढकलत आणत होता.
तसेच त्याच्या पाठीमागून स्वप्निल धनाजी नारगुडे (रा.खेडशी,रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा सुप्रिमो टेम्पो (एमएच-08-एसी-1638) घेऊन येत असताना ट्रक अचानकपणे उतारात पाठीमागे येत त्याने दोन्ही वाहनांना धडक दिली.
यात दुचाकी ट्रकच्या पाठीमागील चाकात आल्याने तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.