उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपने (BJP) बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, शिवसेनेला (Shiv Sena) नोटा पेक्षाही कमी मते मिळाली, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, अशा शब्दांत भाजपचे नेत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
बोरूबहाद्दर आणि युवराज गोवा-गोरखपूरमध्ये गेले, बदल घडवू असे सांगितले. परंतु गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत, ते गोवा आणि उत्तर प्रदेशात काय करतील? नोटाला जेवढी मत आहेत, त्यापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाली आहेत, अशी खोचक टीका करत आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि युवानेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले.
आशिष शेलार म्हणाले, शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. बत्ती गुल झाली. आता मुंबईत देखील परिवर्तन घडणार आहे. शिवसेनेची बत्ती गुल होईल. ‘मोदी है तो मुमकीन है, मुंबईत ही चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस काम करणार.’
दरम्यान, शिवसेनेने गोव्यात आपले उमेदवार उभे केले होते. पण तिथे एकही जागा मिळाली नाही. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजप सरकार स्थापण करणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून देशभरात विजयी जल्लोष सुरु केला आहे. मुंबईत देखील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे