मुंबई पोलीस दलाचे आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना दिलासा देणारे निर्णय सुरु केले आहेत. संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांचा कारभार जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये लावली जाणारी वाहनं क्रेनद्वारे न उचलण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. ज्या मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालायत जावं लागायचं ते आता पांडे यांच्या निर्णयानं बंद होणार आहे. संजय पांडे यांनी मुंबईकरांना ही चांगली बातमी ट्विट द्वारे दिली आहे. मुंबईकरांनी देखील या निर्णयाचं स्वागत केल्याचं दिसून येत आहे.
भारतीय नागरिकाला कोणत्याही कारणासाठी देशाबाहेर जायचं असल्यास त्याकडे पासपोर्ट असणं आवश्यक असतं. पासपोर्ट काढण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीबद्दल पडताळणी केली जाते. यामध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागतं. या प्रक्रियेत अनेकदा वेळ लागतो. नागरिकांना देखील अनेकदा पोलीस स्टेशनला जावं लागतं. मात्र, आता संजय पांडे यांनी पासपोर्ट पडताळणीसंदर्भात घेतलेला निर्णय दिलासादायक ठरणार आहे. संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर करताना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस स्टेशनला बोलावणार नसल्याचं म्हटलं आहे. अपवादात्मक स्थितीत नागरिकांना पोलीस स्टेशनला यावं लागेल, असं ते म्हणाले आहेत.
संजय पांडे यांनी पासपोर्ट पडताळणी संदर्भातील निर्णय जाहीर करताना मुंबईकरांना एक आवाहन देखील केलं आहे. पासपोर्टसाठी मुंबईकरांना आता पोलीस स्टेशनला यावं लागणार नाही. अपवादात्मक स्थिती पोलीस स्टेशनला यावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. मात्र, एखाद्या ठिकाणी या निर्णयाचं पालन होत नसल्यास थेट तक्रार दाखल करा, असं संजय पांडे म्हणाले आहेत.
संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईकरांनी सोशल मीडियावरुन या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुंबई करांनी संजय पांडे यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. संजय पांडे आगामी काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोण कोणते निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 8 तासांची ड्युटी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचं देखील स्वागत करण्यात आलं आहे.