ताजी बातमी ऑनलाईन टीम
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात आता भाविकांना थेट प्रवेश मिळणार आहे. लोकभावनेचा आदर करत दर्शनासाठी आवश्यक असणारा ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान व्यवस्थापन समितीने शनिवारी घेतला. त्यानंतर लगेचच अंबाबाई मंदिराचे महाद्वार उघडण्यात आले आणि भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई आणि जोतिबा मंदिर पूर्णपणे बंद होते. ही मंदिरे खुली झाल्यानंतर दि. 7 ऑक्टोबर 2021 पासून दर्शनासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला. सकाळी सहा ते रात्री नऊ या कालावधीत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता.
ई-पासद्वारे दर्शन सुलभ होत आहे, अशी भूमिका देवस्थान समितीने घेतली होती. मात्र, सर्वसामान्य भाविकांना हा पास काढणे शक्य होत नाही. बाहेरगावाहून आलेले अनेक भाविक यामुळे दर्शन न घेताच परत जातात. दररोज मंदिरात येणार्या स्थानिक भाविकांसाठी ई-पास अडचणीचा ठरत असल्याने तो रद्द करावा, अशी भूमिका भाविकांसह विविध संस्था, संघटनांनी घेतली होती.
जोतिबा मंदिरातही ई-पास रद्द करून मंदिराचे सर्व दरवाजे खुले करावेत, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद करून आंदोलन सुरू केले. कोल्हापुरातही आज विविध संघटनांची बैठक झाली. या बैठकीत महाद्वार न उघडल्यास कुलूप तोडून प्रवेश करण्याचा इशारा देण्यात आला होता.
भाजपच्या वतीनेही रविवारी आंदोलन जाहीर केले होते, तर महाद्वार रोडवरील व्यापारी सोमवारपासून साखळी उपोषण करणार होते. या सर्व पार्श्वभूमीवर ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला. या निर्णयानंतर भाविकांनी महाद्वार चौकात एकत्र येऊन साखर वाटप करण्यात आली. फटाके उडवून जल्लोष करण्यात आला. तसेच देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
जोतिबा यात्रा व अंबाबाई रथोत्सव यंदा जल्लोषात
अंबाबाईचा रथोत्सव सलग दोन वर्षे भाविकांविना झाला. यावर्षी मात्र तो भाविकांच्या उपस्थितीत आणि पूर्ण जल्लोषात होणार आहे. यंदाचा रथोत्सव पूर्वीप्रमाणेच होईल.त्याचप्रमाणे जोतिबाची यात्राही भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे, असे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.