आजरा-आंबोली मार्गावर वेळवट्टी फाटयाजवळ १३ लाख ३४ हजारांच्या गुटख्यासह ३ लाखांचे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी शितल जनार्दन पाटील (वय ४६, रा. बांधा ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी, सोमवारी (दि. १४) पहाटे आजर्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांना आजरा-आंबोली मार्गावरून अवैध गुटख्याची (Gutkha) वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक हारूगडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहाय्यक फौजदार वीराप्पा कोचरगी, पोलीस अंमलदार रणजित जाधव, विशाल कांबळे, प्रशांत पाटील, पांडुरंग गुरव, संदीप मसवेकर, संतोष घस्ती, अशोक शेळके यांच्या पथकाने आजरा- आंबोली मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली.
पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या गाडीची (एमएच ०७ पी ३४९३) झडती घेतली असता त्यांच्या गाडीत गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आढळून आला. या सर्व मालाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित करून विक्री व वाहतुकीस बंदी घातली आहे. पाटील यांच्या गाडीतून एकूण १३ लाख ३४ हजार ०७९ रूपयांचा विविध कंपनीचा गुटखा, पानमसाला, तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच ३ लाख किमतीची गाडीही जप्त करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हारूगडे करीत आहेत.