घरपण (ता. पन्हाळा) येथे टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या भक्ती उर्फ सई अजित गुरव (वय 1 वर्ष 11 महिने) या बालिकेचा दवाखान्यात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी टेम्पो चालक प्रदीप उर्फ बंडा धोंडिराम देसाई याच्यावर कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी घरपण येथील गुरव गल्लीमध्ये भक्ती घरासमोर खेळत होती. यावेळी चालक प्रदीप याने टेम्पो (क्र.एम. एच. 11 टी 0091) क्लिनर नसताना रिव्हर्सने मागे घेत असताना बालिकेला धडकला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
नातेवाईकांनी उपचारासाठी तिला तातडीने सीपीआरला नेले. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे आई, वडील, आजी, आजोबा, चुलते असा परिवार आहे.