ताजी बातमी ऑनलाइन टीम
नव्याने झालेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनाने अख्ख्या मेंढ्यांच्या कळपालाच चिरडलं. यात जवळपास 50 ते 60 मेंढ्यांना चिरडून हे वाहन पुढे निघून गेलं. मेंढ्यांना घेऊन निघालेले मेंढपाळ या वाहनांना थांबा थांबा म्हणून हातवारे करत होते. मात्र वाहनाने त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं आणि गरीब जनावरांना चिरडत हे वाहन पुढे निघून गेलं. एवढा जीव लावलेलं, महागातलं जनावर असं डोळ्यादेखत चिरडलं गेल्यानं मेंढपाळाचा जीव कासावीस झाला. धुळे-सोलापूर महामार्गावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
मृत मेंढ्यांची दृश्य विचलित करू शकतात, म्हणून आम्ही ती दाखवली नाहीत.
10 ते 15 मेंढ्यांचा चिखल
औरंगाबादमध्ये धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. या घटनेची आपबिती सांगताना मेंढपाळ म्हणाले, ‘ मेंढ्या रस्त्यावरून येत असताना एक इंडिका भरधाव वेगाने येत होती. आम्ही सर्वांनी त्याला खूप वेळा हातवारे केले. पण ती थांबली नाही. पुढे गेल्यावर चुक झाली असे दाखवत त्याने हातवारे केले. मेंढ्यांना चिरडत निघालेल्या या इंडिकाखाली आमचं माणूसही चिरडलं जाणार होतं. बरं झालं जितराब गेलं अन् जीव वाचला…’ या अपघातात 10 ते 15 मेंढ्यांचा जागेवरच चिखल झाला होता. तसेच अनेक मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यामुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.
हायवेमुळे वन्य प्राण्यांचाही निवारा गेला
शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे-सोलापूर हायवेवर चारचाकी वाहने आणि मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात असतात. यामुळे डोंगरावर चरण्यासाठी गेलेल्या गाई-गुरांना डोंगर उतरून गावात जाण्यासाठी रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे अनेकदा याठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. तसेच डोंगरावरील वन्यप्राणीदेखील या रस्त्यावर अनावधानाने येतात आणि वाहनाखाली चिरडले जातात. याविरोधात पर्यावरण संरक्षण कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला जाळ्या लावण्याचेही आवाहन केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे असे अपघात घडतात.