ताजी बातमी ऑनलाइन टीम
सांगली-कोल्हापूर मार्ग आता महामार्ग नसून तो मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांत सांगली-कोल्हापूर महामार्गावर 34 हून अधिक जणांचे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे; तर महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असतानाही बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर महामार्गातील त्रुटी दूर करणार, असा सवाल वाहनधारकांतून होत आहे.
सांगली – कोल्हापूर महामार्गावरील उदगाव, जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, माले फाटा, हेरले ही अपघातप्रवण क्षेत्रे बनली आहेत. सध्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात या मार्गाचे विलीनीकरण करण्याच्या कारणातून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावर दुभाजक, जोड रस्त्याला पांढरे पट्टे, गतिरोधक, दिशादर्शक फलक, ओढ्यावरील पुलाला संरक्षण कठडे नाहीत, तमदलगे येथे धोकादायक बाह्यवळण, हातकणंगले येथे अर्धवट स्थितीतील उड्डाणपूल अशा मोठ्या समस्या असताना, शिवाय अपघाताचीही मालिका मोठी असताना सर्व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सध्या सांगली सिव्हिल रुग्णालयात सहा महिन्यांत महामार्गाचे 24 बळी गेल्याची नोंद आहे. शिवाय इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत 10 हून अशा 34 हून अधिक जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाघवाडी -इस्लामपूर फाटा रस्त्यावर मुलाचा खून की अपघात?
वाघवाडी फाटा-इस्लामपूर रस्त्यावर सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट (वय १३रा. अभियंता नगर, पेठ ता. वाळवा ) या मुलाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या मुलाची डोक्याची कवटी फुटली आहे. त्याच्या बाजूला झोपलेले दोघेही सुरक्षित आहेत. त्यामुळे खून की अपघात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे लोक दगड घडवण्याचे काम करत आहेत. दगड काम करणारे तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. झोपलेल्या अवस्थेत हर्षवर्धन याचा सकाळी मृतदेह मिळल्याने एकच खळबळ उडाली. हर्षवर्धन याच्या डोक्याची कवटी फुटली आहे. त्याच्या बाजूला झोपणाऱ्यांनी त्याच्या डोक्यावरून वाहन गेल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, चेतन माने पथकासह श्वानपथक, फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे.