ताजी बातमी ऑनलाइन टीम
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांच्या स्थानिय विकास निधीत एक कोटींची वाढ करीत त्यांना अधिवेशनाची खास भेट दिली. त्यासोबतच आमदारांच्या वाहन चालक आणि स्वीय साहाय्यकाच्या पगारतही पाच हजाराची वाढ केली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी विधानसभेत केली.
सद्या आमदारांना दर वर्षी चार कोटी रुपयांचा स्थानिय विकास निधी मिळत होता. अजित पवार यांच्या घोषणेमुळे तो आता पाच कोटी झाला आहे. मागील भाजप सरकारच्या काळात ३ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत होता. अजित पवार यांनी मागील अधिवेशनात एक कोटी तर या अधिवेशनात एक एक कोटींची वाढ केली. आता राज्यातील आमदारांना आता खासदारांएवढा निधी मिळणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
तर सद्या आमदारांच्या वाहन चालकांना १५ हजार रुपये वेतन मिळत होते ते २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला २५ हजाराऐवजी ३० हजार रुपये वेतन देणार असल्याची पवार यांनी घोषणा केली. या घोषणेचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.