केंजळ नजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून दुचाकी जोरदार धडकल्याने गोगलेवाडी येथील युवक जागीच ठार झाला. ही अपघात (गुरूवार) सायंकाळी झाला. या अपघाताची बातमी कळताच गोगावलेवाडी ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी करून गदारोळ केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोगावलेवाडी (ता. सातारा) येथील युवक शैलेश बाळाराम गोगावले (वय 23) हा गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मेढयाहून आपल्या गावाकडे होळीसाठी येत होता. या दरम्यान केंजळ नजीक असलेल्या सातारा-मेढा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून येत त्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील युवक हा दुचाकीसह ट्रॉलीच्या उसात जाउन अडकला.
या भीषण अपघातात दुचाकीस्वार शैलेश हा जागीच ठार झाला. रात्री उशीर झाला तरी शैलेश घरी आला नसल्याने कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांना अपघाताची माहिती कळाली. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांसह ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी करून ट्रॅक्टर मालकास आमच्या हवाली करा, असे म्हणत गदारोळ केला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे (गुरुवार) रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. शैलेश गोगावले याने विज्ञान शाखेतून नुकतीच पदवी मिळवली होती. तो नोकरीचा शोध करीत आपल्या वडिलांसमवेत ट्रॅक्टर व मळणी यंत्राच्या साह्याने शेती व्यवसाय करीत होता. अचानक झालेल्या अपघातात एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शैलेशच्या पश्चात आई-वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.