जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. शिक्रापूर तालुक्यातून एका धक्कादायक घटनासमोर आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला दारू पाजून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओळखीतील तरुणाने हिणकस कृत्य केलं आहे. पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीसोबत देव दर्शनाला घेऊन जातो,असे सांगत तिला कारमध्ये बसवून नेले. त्यानंतर पीडित मुलीला जबरदस्तीने दारू पाजून तिचा विनयभंग करण्यात आला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आरोपीवर अॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर सुनील वर्पे असे आरोपीचे नाव असून आरोपी सागर हा पीडित मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील करंदी येथे राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्याच वेळी आरोपी सागर वर्पे हा चारचाकी कार घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरासमोर आला. पीडित मुलीची मैत्रीण व सागर यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. दरम्यान त्याने पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर आपण नारायणपूरला देव दर्शनाला जाऊ माझ्यासोबत माझी पत्नीदेखील येत आहे, तुम्ही पण चला असे म्हणून कारमध्ये बसून घेऊन गेला. त्यानंतर शिक्रापूरपासून काही अंतर गेल्यानंतर सागर याने कोल्ड्रिक्स आणि दारू घेतली . त्यानंतर त्याने कारमध्ये बसून युवती व तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने दारू पाजली. दारुचे सेवन केल्याने युवतीला काही त्रास होऊ लागला, दरम्यान त्याचवेळी सागर हा तिच्याशी अश्लिल चाळे करू लागला.
आरोपी सागरने पीडित मुलीला तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत. ते मी सोशल मीडियावर व्हायरल करील अशी धमकी दिली. यावेळी पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीने आम्हाला घरी सोड, नाहीतर आम्ही घरी फोन करू असे म्हटले. त्यानंतर काही वेळाने दोघी मैत्रिणींना त्यांच्या घरी आणून सोडले. यानंतर पीडित युवतीने घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली. सागर वर्पे यांच्यावर पूर्वी 2015 मध्ये एक , 2017 मध्ये तीन , 2019 मध्ये एक, आणि 2020 मध्ये एक असे गुन्हे शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.