कालचा दिवस धुडवळीचा होता. त्यामुळं रंगोत्सवात रंगोत्सवात सारेच रंगले. असाच उत्साह घेऊन हरीश मनीष इलमेनं (19) तुमसरात रंग उधळले. मित्रांसोबत मस्त मज्जा केली. एकमेकांना रंग लावण्यात सारे दंग झाले होते. आता आपण रंगलो. स्वच्छ व्हावं लागेल, यासाठी मग त्यांनी तुमसरवरून दहा किमीवर असलेल्या माडगी घाटावर जाण्याचे ठरविले. माडगी घाट हे वैनगंगा नदीवर आहे. त्याठिकाणी अंघोळीला काही लोकं येतात. सहकारी मित्रांसोबत बजाजनगरातील हरीश इलमे हा देखील गेला. वैनगंगा नदीत आंघोळ करत असताना तो खोल पाण्यात जाऊ लागला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. मित्र बाजूला होते. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. नाकातोंडात पाणी गेले. वाचवा… वाचवा असं ओरडला. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
ही घटना रेल्वे पुलावजळील नृसिंह मंदिर परिसरात घडली. सोबतचे मित्र घाबरले. काय करावे त्यांना काही सूचले नाही. मित्रांच्या दुचाकी किनाऱ्यावर होत्या. प्रकरण पोलिसांत गेलं. करडी पोलिसांनी घटनेची माहिती हरीशच्या पालकांना दिली. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. हरीश हा होतकरू तरुण होता. पण, एका चुकीमुळं त्याला जीव गमवावा लागला. आता पश्चाताप करून काही फायदा नाही. गेलेला जीव पुन्हा येणार नाही. म्हणून काळजी घेणे हेच आपल्या हातात असते. पोहायला कुठे जात असाल, तर नवीन ठिकाणी खोल पाण्यात जाऊ नका. अन्यथा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.