भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री आहेत. एकापाठोपाठ एका नेत्यावर किरीट सोमय्या आरोप करत असून त्यांचे घोटोळे बाहेर काढण्याचा इशारा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेचे नेते अनिल परब हे सोमय्यांच्या रडारवर आहेत. किरिट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टबद्दल ट्वीट केले आहे. या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली होती. यातील दोन नेते तुरुंगात असल्याचे सांगत उर्वरित 10 नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर अनेक दिवस शांत बसल्यानंतर किरीट सौमय्या यांनी ट्वीट करत परत एकदा खळबळ उडवली आहे. सध्या किरीट सोमय्या यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘चला दापोली, 26 मार्चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया,’ असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी या ट्वीटमध्ये अनिल परब यांच्या रिसॉर्टचा फोटो देखील पोस्ट केला आहे. हे ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी 26 मार्चला दापोलीला जाऊन अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप करत आहेत. आता अखेर त्यांनी ट्वीट करत बॉम्ब फोडला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेला दापोलीमध्ये जाऊन किरीट सोमय्या नेमकं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी याआधी अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टसंदर्भात एक ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘श्री अनिल परब, रिसॉर्टच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये रोख स्वरूपात खर्च झाल्याचे आयकर विभाग सांगत आहेत. ही रोख रक्कम कुठून आली? ही वसुली वाझेंची होती की खरमाटेची?,’ असे प्रश्न विचारले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी काही डॉक्युमेंट्स देखील शेअर केले होते.