बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट होळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला. देशभरातील चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी, अॅक्शन, इमोशनने परिपूर्ण असलेल्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत इतर सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी ‘बच्चन पांडे’
चित्रपटानेने 13 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता अर्शद वारसी हे मुख्य भूमिकेत आहेत. होळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला ‘बच्चन पांडे’ आणि त्यांच्या आवडत्या स्टार्सचा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती.
चित्रपट ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, ‘बच्चन पांडे’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 13.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तरण यांनी सांगितले की, ‘अक्षय कुमारचा चित्रपट कोरोनाच्या काळात कमाईच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी याला कौटुंबिक मनोरंजन चित्रपट म्हटले आहे. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहता येऊ शकतो असे त्यांनी सांगितले आहे. चित्रपटगृहातील प्रेक्षकांची गर्दी पाहून बच्चन पांडे दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई करू शकतात, असे देखील त्यांनी म्हटलं आहे.