सध्या सर्वत्रच मोठ्या प्रमाणात सण, समारंभ आणि उत्सव सुरू आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या चमक येथील एका कार्यक्रमात सकाळचे जेवण रात्री खाल्ल्याने तब्बल पंचवीस जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत 25 नागरिकांना विषबाधा झाली असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झालेल्या सर्व नागरिकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या चमक येथे हरिभाऊ चरोडे यांच्या तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पाहुण्यांसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यातील काही पाहुण्यांनी दिवसाचे हेच अन्न रात्री खाल्ले. त्यांना त्रासदायक वाटले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक जणांना ताप उलट्या व्हायला सुरुवात झाली. मात्र दिवसभर दुर्लक्ष केल्यानंतर अनेकांना त्रास वाढल्याने नागरिकांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यातील 25 जणांना विषबाधा झाली असून 4 जण हे गंभीर अवस्थेत असल्याची माहिती कळते.
नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. प्रसाद खाल्ल्यानंतर विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर झाली. सर्व बाधितांवर राकसवाडे आरोग्य केंद्रातच उपचार सुरू करण्यात आले. महाशिवरात्रि निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन गावात करण्यात आले होते. मात्र महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होवू लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितले.