ताजी बातमी ऑनलाईन टीम
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) राजस्थान उच्च न्यायालयाकडून (Rajasthan High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. आता यासंबंधीच्या सर्व प्रकरणांची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खानने हायकोर्टात बदलीसाठी याचिका दाखल केली होती. या सुनावणीवेळी सलमान खानची बहीण अलविराही उपस्थित होती.
1998 मध्ये अभिनेता सलमान खानला जोधपूरजवळील एका गावात दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सलमान खान त्यावेळी सूरज बडजात्याच्या ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने जोधपूरमध्ये होता. या प्रकरणी सलमानवर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 2021 मध्ये जोधपूरच्या जिल्हा कोर्टातून सलमान खानला या प्रकरणात दिलासा मिळाला. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सलमान खानविरोधातील राजस्थान सरकारची याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सलमान खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती.
5 एप्रिल 2018 रोजी ट्रायल कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दोषी ठरवले होते आणि पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर या प्रकरणातील सहआरोपी चित्रपट अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती आणि सलमान खानला अटक करून जोधपूर तुरुंगात रवानगी करण्यात आले. तीन दिवसांनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान सलमानने त्याला सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. तर आर्म्स ऍक्ट प्रकरणी न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला राज्य सरकारने न्यायालयात आव्हान दिले आहे.