मूळ सांगली जिल्ह्यातील, मात्र सध्या सातार्यात फिरस्त्या असणार्या कुटुंबातील अवघ्या 4 वर्षीय चिमुरडीचे सोमवारी पहाटे अपहरण करून सोनगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत सापडली असून, तिला पुणे येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने सातारा हादरला असून, नराधमाच्या शोधासाठी पोलिसांनी कसून मोहीम राबवली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरस्ते असणारे एक कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचे नातेवाईक सातारा तालुक्यातील आहेत. या कुटुंबात चार वर्षांची मुलगी आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब झोपी गेले. पहाटे साडेसहा वाजता मुलीच्या आईला जाग आल्यानंतर तिला मुलगी दिसली नाही. मुलीचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने कुटुंब भयभीत झाले. तोपर्यंत दुसरीकडे सोनगाव गावच्या हद्दीत एका वस्तीलगत वृद्ध दाम्पत्याला संबंधित मुलगी निदर्शनास आली. तिची केविलवाणी अवस्था पाहून हे दाम्पत्यही गहिवरले. मुलीला तिच्या आई, वडिलांबाद्दल विचारल्यानंतर त्या मुलीने हाताने रस्त्याकडे बोट केले.
वृध्दाने त्या मुलीला घेवून ती दाखवते त्या रस्त्याकडे नेले. मात्र तेथे कोणीही नव्हते. पुन्हा त्या मुलीला शुध्दीवर आणत आईबाबत विचारल्यानंतर ती पुन्हा दुसरीकडे हात दाखवू लागली. वृध्दाने तिकडे जावून पाहिल्यानंतरही तेथे कोणी नसल्याने वृध्द दाम्पत्य गोंधळून गेले. मुलीची माहिती गावातील ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली.