सांगलीतील हरिपूरमध्ये दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सुरेश नांद्रेकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते आरटीओ एजंट म्हणून काम करत होते. सांगलीच्या हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. तरुणांच्या टोळक्याने पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक हल्लेखोरांच्या शोधात आहे.
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील हरिपूर येथील सुरेश नांद्रेकर (वय 47 वर्ष) यांची हत्या करण्यात आली. तिघा हल्लेखोरांनी डोक्यावर आणि तोंडावर वार करुन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
सोमवारी रात्री उशिरा हरिपूर रस्त्यावरील गजानन कॉलनीत नांद्रेकर यांच्या शेताजवळ हा प्रकार घडला. टोळक्याच्या हल्ल्यात पतीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणारी सुरेश नांद्रेकर यांची पत्नीही यात गंभीर जखमी झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
नांद्रेकर दाम्पत्यावरील हल्ल्याचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु दुचाकी चोरीला गेल्याच्या कारणावरुन नुकताच त्यांचा वाद झाल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.