शिवसेनेकडून तिथीनुसार सोमवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवली शहरात ठिकठिकाणी बॅनर (Banner) लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. यावेळी डोंबिवलीमध्ये लागलेले काही बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला होता. याच बॅनरबाजीवरून भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
यांचा पिंड हिंदुत्व नाही, यांना हिंदुत्व काय हे आधी माहितच नव्हतं, हे उसनवार घेतलेले शहर प्रमुख आहेत, म्हणून अशा चुका घडतात अशी टीका चव्हाण यांनी केली. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचे डोळे उघडले आहेत की नाही हे पाहण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत त्यातच आता या बॅनरवरून पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
या टीकेला आज शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी भाजप आमदारांना इतकेच सांगणे आहे. उल्हासनगरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत 22 ते 24 होर्डिंग लावले होते. त्यामध्ये दोन ठिकाणी नजरचुकीने संभाजी महाराजांचे फोटो आले आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मात्र इतर सर्व बॅनरमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो होते. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. त्यांनी विकासाबद्दल बोलावं. विकासाबद्दल शब्दही बोलत नाहीत. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्ववादीच राहणार असल्याचे राजेश मोरे यांनी स्पष्ट केले.