ताजी बातमी ऑनलाइन टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर संबंधित राज्यांमध्ये सरकार स्थापण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांची वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांच्या वाढीचा भडका उडाला आहे.
ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 96.21 रुपयांवर, तर डिझेलचे दर 87.47 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये हेच दर क्रमशः 110.82 आणि 95 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे पेट्रोल 105.51 रुपयांवर, तर डिझेल 90.62 रुपयांवर गेले असून, चेन्नई येथे हे दर क्रमशः 102.16 आणि 92.19 रुपयांपर्यंत वाढले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध तसेच युरोपियन देशांकडून रशियाच्या तेलावर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताने जागतिक बाजारात इंधनाचे दर भडकले आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रेंट क्रूड तेलाचे दर शंभर डॉलर प्रतिबॅरलच्या खाली गेले होते, हे दर आता 118 डॉलरच्याही वर गेले आहेत.
असे आहेत गॅस सिलिंडरचे दर…
तेल कंपन्यांनी 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडर दरात 50 रुपयांची वाढ केली आहे. याआधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आले होते. ताज्या दरवाढीनंतर मुंबई आणि दिल्लीत गॅस सिलिंडरचे दर 949.50 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता आणि लखनौ येथे हेच दर क्रमशः 976 व 987.5 रुपयांवर गेले आहेत. पाटणा येथे हे दर 1,047.5 रुपये, चेन्नई येथे 965.5 रुपयांवर गेले आहेत. 5 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर सध्या 349, तर 10 किलो वजनाच्या सिलिंडरचे दर 669 रुपयांवर आहेत. व्यावसायिक वापराच्या 19 किलो वजनाच्या सिलिंडरचे दर 2,003.50 रुपयांवर स्थिर आहेत.