देशामधील राष्ट्रीय महामार्गांवर आता 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकच टोल असणार असून जर दुसरा टोल आढळला तर तो तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या कमी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “देशातील अनेक ठिकाणी 60 किमी अंतराच्या आत टोल आहे. हे कायदेशीर नाही. वाहनधारकांकडून पैसे मिळत असल्याने आपल्या खात्याकडून टोलसाठी परवानगी मिळत असते. आता या गोष्टी होणार नाहीत. मी या सभागृहाला आश्वासन देतो की, देशात असे जे 60 किमी अंतराच्या आतील टोल असतील ते टोल येत्या तीन महिन्याच्या आतमध्ये बंद केले जाणार आहेत”, असं ते म्हणाले.
स्थानिकांना पास मिळणार..?
टोलनाक्याजवळ राहणाऱ्या स्थानिकांसाठी टोलमध्ये सूट देण्यात येणार आहे. फक्त आधार कार्ड दाखवून स्थानिकांना पास देण्यात येईल. हा पास दाखवून स्थानिकांना टोलचे पैसे देताना त्यामधून सूट मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
याशिवाय पुढील तीन महिन्यांमध्ये 60 किमीच्या अंतरामध्ये येणारे इतर टोल नाके आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल देण्यास वैतागलेल्या प्रवाशांना आता सुटकेचा निश्वास घेता येणार आहे. तर टोल नाक्यांच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही टोल द्यावा लागणार नाही. यापूर्वी टोल नाक्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी वारंवार मागणी केली होती की, त्यांच्याकडून टोल वसूल केला जाताना सवलत दिली जावी. आता त्यानुसार त्यांना पासेस ची सुविधा दिली जाणार आहे. तसेच, नितीन गडकरी म्हणाले की, “2024 च्या अखेरपर्यंत भारतातील पायाभूत सुविधा आणि रस्ते हे अमेरिकेच्या बरोबरीनं असतील, अशी मी खात्री देतो”, असं भक्कम आश्वासनही दिलं आहे.