इंडियन प्रीमियर लीगच्या (TATA IPL 2022) १५व्या हंगामाला शनिवार दि. २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी, आयोजकांनी प्रेक्षक आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
आयोजकांनी बुधवारी सांगितले की (TATA IPL 2022), स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच यावेळी चाहत्यांना स्टेडियमवर उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करता येणार आहे. आजपासून (दि. २३) तिकिटांची विक्री सुरू झाली असून, चाहत्यांना ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. चाहत्यांसाठी अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर २३ मार्च रोजी दुपारी १२ पासून स्पर्धेच्या लीग टप्प्यासाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. याशिवाय www.BookMyShow.com वरही तिकिटे उपलब्ध असतील.
Book My Show च्या वेबसाइटनुसार, २६ मार्च रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या सामन्यासाठी चार प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. यामध्ये २५००, ३०००, ३५०० आणि ४००० रुपयांची तिकिटे आहेत. पहिल्या सामन्याशिवाय इतर सामने आणि स्टेडियम्सबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल सामन्यांच्या तिकिटांची विक्री ८०० रुपयांपासून सुरू आहे आणि सर्वाधिक ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. ज्यामध्ये कोविड-१९ प्रोटोकॉलनुसार स्टेडियमच्या क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामना पाहता येईल. आयपीएलमध्ये (IPL 2022) लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांच्या समावेशामुळे या हंगामातील संघांची संख्या १० झाली आहे. मुंबई आणि पुणे येथील ४ स्टेडियमवर सामने होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम या मैदानांवर सामने होणार आहेत, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे सामने होणार आहेत.