Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा, पिकांना फटका

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा, पिकांना फटका

सांगली शहरासह मिरज, तासगाव, पलूस, वाळवा, विटा, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह उन्हाळी पावसाने गुरुवारी रात्री हजेरी लावली. अनेक भागांत रस्त्यावर आणि शेतात पाणी साचले होते. या पावसाचा गहू, हरभरा, शाळू, कलिंगड, टोमॅटो, द्राक्ष पिकांना फटका बसला. काही भागांत झाडे उन्मळून पडली. अंतिम टप्प्यात असलेल्या ऊसतोडीला या पावसाने ब्रेक मिळाला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दोन दिवस सांगली, मिरज शहर वगळता जिल्ह्यात कोठेही पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, गुरुवारी जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पाऊस झाला. सांगली शहरात रात्री पावसाला सुरुवात झाली.

तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यातील पूर्व भागात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

मांजर्डे/आंधळी: तासगाव तालुक्यातील आरवडे, मांजर्डे, बलगवडे, पेड, नसरेवाडी, सावर्डे, कौलगे, चिंचणी, डोर्ली, हातनूरसह परिसरात जोरदार पाऊस झाला. परिणामी, शिवारात पाणीच पाणी झाले होते. तसेच याच तालुक्यातील राजापूर आणि भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सायंकाळी तुरळक पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसह शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. तालुक्यातील काही ठिकाणी बेदाणा शेडवर द्राक्षे टाकली आहेत. पावसामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कडेगाव : कडेगाव शहरासह तालुक्यात अनेक भागांत सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळला. आडसाली ऊस पिकांना हा पाऊस लाभदायक आहे. मात्र या पावसाचा कलिंगड, टोमॅटो, द्राक्ष बागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत.

पलूस: तालुक्यातील पलूस, कुंडल, दुधोंडी, अंकलखोप, भिलवडीसह परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसाचा द्राक्ष बागांसह रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे.

आष्टा : आष्टा शहर व परिसरात वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी, बावची, गोटखिंडी या भागातही जोरदार पाऊस झाला.

इस्लामपूर/ वाळवा: इस्लामपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हुबालवाडी, खरातवाडी, बहे, साखराळे परिसरात मात्र वार्‍यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. वार्‍यामुळे ऊसपिकाचे नुकसान झाले. तर ऊसतोडणी मजुरांच्या खोपटी वार्‍याने उडून गेली. त्यामुळे मजुरांची पळापळ झाली. त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. वाळवा तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस कोसळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -