आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत मुंबईच्या गिरी/म्हेत्रे बैलगाडीने विजेतेपद मिळवत दोन तोळे सोने व चांदीची गदा पटकावली. या शर्यतीत तब्बल 120च्या वर बैलगाडा चालक व मालकांनी हजेरी लावली. जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली होती. दरम्यान, एका महिलेने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
देगाव, ता. सातारा येथे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अजिंक्यतारा केसरी-2022’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन सौ. कांचन साळुंखे यांनी केले होते. शर्यतीवेळी आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी हातात कासरा धरुन बैलगाडीतून मैदानावर जोरदार एन्ट्री केली. शर्यतप्रेमींनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. या शर्यतीत अजिंक्यतारा केसरी प्रथम विजेतेपदाचा मान गिरी / म्हेत्रे, मुंबई या बैलगाडा मालक-चालकास मिळाला. त्यांना 2 तोळे सोने व चांदीची गदा मिळाली. देगाव युवा प्रतिष्ठान द्वितीय विजेता- दीड तोळे सोने व चांदीची गदा, त्रितीय विजेता पप्पू जगदाळे-कुमठे – एक तोळा सोने व चांदीची गदा, चतुर्थ विजेता- अक्षय मोरे, गोडोली अर्धा तोळा सोने व चांदीची गदा, पाचवा विजेता आप्पा इंदोली यांच्यासह सहा व सात क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.