Sunday, December 22, 2024
Homenewsमहिला पोलिसने सुपारी देऊन पोलिस नाईकची ‘कशी’ केली हत्या? जाणून घ्या..

महिला पोलिसने सुपारी देऊन पोलिस नाईकची ‘कशी’ केली हत्या? जाणून घ्या..



मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या महिला पोलिस शिपाईने अंतर्गत वादाचा वचपा काढण्यासाठी थेट अपघाताचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने सुपारी देत सहकारी पोलिस नाईकची हत्या घडवून आणली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी महिला पोलिस शिपाईसह दोघांना अटक केली आहे.

या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अंगावर नॅनो गाडी घालून हत्या करत तो अपघात असल्याचे आरोपींनी बनाव रचला होते. मात्र पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे.

मुंबई पोलिस दलात पोलिस नाईक असलेल्या शिवाजी सानप व महिला पोलीस शिपाई शितल पानसरे दोघांनी मुंबई नेहरू नगर पोलिस ठाण्यात एकत्र नोकरी केली आहे. दोघांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र याच मैत्रीने सानपचा घात केला.

2019 मध्ये महिला पोलिस शिपाई शितल पानसरे हिने सीबीडी आणि विष्णू नगर पोलिस ठाण्यात सानप विरोधात बलात्कार 376, विनयभंग 354 आणि इतर कलमान्वये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर शितलने सानपचा वचपा काढण्याचा निर्णय घेत तीन वर्षांपासून कट रचला आणि 15 ऑगस्ट रोजी सानपचा अपघातात मृत्यू झाला.

मात्र हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. सानपचा येण्याचा आणि जाण्याच्या मार्गाचा तपास सुरू केला.

सानप पनवेल रेल्वे स्थानकात उतरून पनवेल बस डेपोकडे जाताना संध्याकाळी अंधाराचा फायदा घेत दोन आरोपींनी शिवाजी सानप यांना मागून धडक देत गंभीर जखमी केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका नॅनो गाडीने मागून येऊन शिवाजी सानप यांना उडवले. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तीन दिवसानंतर शिवाजी सानप यांचा मृत्यू झाला.

वापरलेल्या नॅनो गाडीला नंबर प्लेट नव्हती. तसेच घटनेनंतर आरोपींनी तरघर येथील निर्जनस्थळी पुरावा नष्ट करण्यासाठी नॅनो जाळली होती. यामुळे नवी मुंबई, पनवेलमधील सीसीटीव्ही शोधून सर्व गल्ली बोळ शोधूनही पिवळ्या रंगाची नॅनो सापडली नव्हती.

तपासात अनेक नॅनो गाड्यांच्या मालकांची चौकशी करण्यात आली, मात्र ठोस काही हाती लागत नव्हते. पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे मुंबईतून फिरवली.

शिवाजी सानप यांनी प्रवास केलेल्या कुर्ला ते पनवेल रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासले. यामध्ये दोन संशयित इसम शिवाजी सानप यांचा पाठलाग करत असल्याचे समोर आले.

सीसीटीव्हीवरून दोन आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले गेले असता खरी हकीकत समोर आली. या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे यांचा हात असल्याचे समोर आले. या हत्येची सुपारी दिल्याचे त्यांनी कबूल केले.

नेहरू नगरपासून पडली वादाची ठिणगी…
मयत शिवाजी सानप व शितल पानसरे हे मुंबईतील नेहरू नगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना दोघांमध्ये वादावादी झाली होती.

यानंतर 2019 रोजी सीबीडी आणि कल्याण पोलिस ठाण्यात शितल पानसरेने शिवाजी सानप यांच्यावर विनयंभग, बलात्कार, मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल केले होते. मात्र यानंतरही कायमचा बदला घेण्यासाठी शितल पानसरेने या हत्येचा कट रचला.

उलवे येथे राहणाऱ्या सोसायटी मधील वॉचमन विशाल जाधव आणि गणेश चव्हाण यांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी आरोपी शितल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण या तीनही आरोपींना अटक केली.

तीन वर्षांपूर्वीच रचला होता शितल पानसरेने हत्येचा कट
आरोपी महिला पोलिस शिपाई शितल पानसरेने तीन वर्षापूर्वीच शिवाजी सानप यांच्या हत्येचा कट रचला होता. पहिले लग्न होऊनही तीने परत एकदा सोशल मीडियाचा वापर करून धनराज जाधव यांच्याशी दुसरे लग्न केले.

अपघात करून हत्या केल्यास संशय येणार नाही, असा विचार शितलने करून ठेवला होता. यासाठी बस चालकाच्या शोधात शीतल होती. यासाठी तिने एसटी महामंडळात काम करणाऱ्या धनराज जाधव याला इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवत गळाला लावला.

अवघ्या पाच दिवसाच्या इंन्स्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात करून पाचव्या दिवशी नाशिक येथे शितल पानसरेने धनराज जाधव यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर शिवाजी सानप या पोलिसाची हत्या करण्यासाठी शितलने धनराज जाधव यांच्याकडे तगादा लावला.

याकडे दुर्लक्ष करत आपण हे काम करणार नाही, असे सांगितल्यानंतर शितल पानसरे हिने धनराज जाधव यांच्या विरोधात विविध कलमांखाली पोलिस तक्रार केली. याला घाबरून धनराज जाधव यांनी एसटी महामंडळाची नोकरी सोडून चेन्नई येथे पळ काढला होता.

या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी धनराज जाधव यांना बोलवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी शितल पानसरेबाबत सर्व जवाब पनवेल शहर पोलिसांनाकडे नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -