सांगली जिल्ह्यातील आष्ट्यानजीक गाताडवाडी फाट्यावर झालेल्या कारच्या भीषण अपघातातील गंभीर जखमी मायलेकींचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात ठार झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. मृत्यू झालेले सर्वजण आगाशिवनगर (ता. कराड) येथील एकाच पोळ कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने आगाशिवनगर पुन्हा शोकसागरात बुडाले.
सरिता सुभाष पोळ व समृद्धी सुभाष पोळ असे उपचारादरम्यान मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. तर याच अपघातात पोळ कुटुंबातील गीताबाई पोळ, सुषमा पोळ व अधिकराव पोळ यांचा आदल्याच दिवशी म्हणजे शनिवारी मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने पोळ कुटुंबाचा कणाच मोडला आहे.
अधिकराव पोळ यांच्यासह त्यांच्या आई गीताबाई पत्नी सुषमा भाऊजयी सरिता व चिमुकली समृद्धी असे पाच जण नातेवाईकाच्या वास्तुशांत समारंभासाठी कारमधून सांगलीकडे निघाले होते. इस्लामपूरमार्गे जात असताना आष्ट्याजवळ गाताडवाडी फाट्यावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गिताबाई व सुषमा पोळ या दोघी जागीच ठार झाल्या. तर अधिकराव पोळ यांच्यासह सरिता व समृद्धी यांच्यावर इस्लामपूर येथीलच रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर व कराडला हलवण्यात आले.
दरम्यान कराड येथे कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अधिकराव पोळ यांचा शनिवारीच मृत्यू झाला. तर सरिता व समृद्धी पोळ यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान रविवारी त्या दोघींचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण पोळ कुटुंबीयांसह आगाशिवनगर शोकसागरात बुडाले. माय-लेकींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सरिता व समृद्धी यांचा मृतदेह आगाशिवनगर येथील पोळ यांच्या घरी आणला. यावेळी नातेवाईकांसह कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. उपस्थितांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत्या होत्या.