दिवसेंदिवस वाहन उद्योगात (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दुचाकी वाहनांची सर्वाधिक वाढ होत आहे. ज्यामध्ये ओला इलेक्ट्रिकची ओला एस1 प्रो (Ola S1 Pro) ही लोकप्रिय स्कूटरपैकी एक मानली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरला देशभरात खूप पसंती मिळाली आहे. दरम्यान, कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर जळताना दिसत आहे. ही घटना पुण्यातील आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काळ्या रंगाची Ola S1 Pro रस्त्यावर जळताना दिसत आहे. ज्यावर लोक सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
ओला इलेक्ट्रिकने पुण्यातील त्यांच्या S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यावर उभी होती, त्यामुळे या घटनेत कोणाच्याही जीवितास धोका निर्माण झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या बाबतीत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. मात्र या घटनेने इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच ओला इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी केले. बंगळुरूस्थित ब्रँडने सांगितले की, “आम्हाला पुण्यातील आमच्या एका स्कूटरसोबत घडलेल्या घटनेची माहिती आहे आणि आम्ही त्याचे मूळ कारण समजून घेण्यासाठी तपास करत आहोत आणि येत्या काही दिवसांत अपडेट शेअर करू. आम्ही ही एक घटना गांभीर्याने घेत आहोत आणि यावर योग्य ती कारवाई करू आणि येत्या काही दिवसांत तुमच्यासोबत माहिती शेअर करू.”
या घटनेवर प्रतिक्रिया देताना ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले, “सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत आणि त्याचे निराकरण करू.” ओला इलेक्ट्रिकने असेही सांगितले की ज्या ग्राहकाच्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत.