ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुष्पा चित्रपटातील “श्रीवल्ली’’ सारखी दिसते म्हणत, एका तरुणीची छेड काढून एका माथेफिरूने भर रस्त्यात तिला मिठी मारली. एवढेच नाही तर पीडितेचा भाऊ तिला सोडविण्यास आला असता, त्यालाही जीवे ठार मारण्याची धमकी देत, मारहाण करण्यात आली.
ही घटना धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत परिसरात भर दिवसा घडल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सोहेल आणि अरबाज (दोघेही रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत एका 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित तरुणी घराबाहेर थांबली असता, दोघे आरोपी तेथे आले. दोघेही तीच्याकडे बघुन शिट्टया मारु लागले. तिने या दोघांना याचा जाब विचारला असता सोहेलने, ‘तू पुष्पा चित्रपटातील हिरोईनसारखी दिसतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे म्हणत तीचा हात धरुन मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता, तिचा भाऊ मदतीला धाऊन आला. यावेळी त्यालाही जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. पीडितेने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करत आहेत.